थालीपीठ हा महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा आवडीचा खाद्यपदार्थ असून, महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थात थालीपीठ हा पौष्टिक आणि खुप खास पदार्थ आहे. महाराष्ट्रातील लोक अगदी आवडीने खातातच आणि महाराष्ट्र बाहेरील लोक देखील तितक्याच आवडीने खातात.
सध्याच्या परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली, तरच आपण संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव करु शकतो. धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तनावामाधे प्रत्येकाला वेळ काढून पौष्टिक पदार्थ बनवुन खायला जमतेच असे नाही, त्यामुळे सारखे आजारी पडणे, अशक्तपणा जाणवणे या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. आपले आरोग्य निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. म्हणूनच पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे आणि थालीपीठाचे किती प्रकार आहेत याची माहिती आपण पुढे बघणार आहोत.
थालीपीठ दोन प्रकारचे असते इन्स्टंट थालीपीठ आणि भाजनीचे थालीपीठ
इन्स्टंट थालीपीठ (INSTANT THALIPEETH)
थालीपीठ करताना भाजनीचे पीठ नसेल आणि झटपट (INSTANT) पौष्टिक थालीपीठ बनवायचे असेल तर घरात उपलब्ध असलेले ज्वारीचे, बाजरीचे, तांदुळाचे, गव्हाचे, बेसणाचे पीठ आणि घरात उपलब्ध असलेल्या किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरुन तुम्हाला थालीपीठ बनवता येतील उदा. पालक, मेथी, कांद्याची पात, किसलेला मुळा, काकडी, गाजर, बीट, कोबी, बटाटा आणि दुधी भोपळा. उरलेले जेवण असेल तर त्यामधे पीठ मसाले घालून थालीपीठ बनवता येते उदा. रात्रीचा भात, डाळ, भाजी अशा झटपट होणाऱ्या थालिपीठला इन्स्टंट थालीपीठ असे नाव दिले आहे. ग्रामीण भागात थलिपीठला धपाटे म्हणतात. इन्स्टंट थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहु.
साहित्य
- घरात उपलब्ध असलेले पीठ २ वाटी
- घरात उपलब्ध असलेल्या भाज्या १ वाटी
- बारीक चिरलेला कांदा १ वाटी
- बारीक चिरलेली कोथंबीर १ वाटी
- भिजवलेले पोहे १ वाटी
- दहि ४ चमचे
- हिरवी मिरची ३-४
- लसूण १०-१२ पाकळ्या
- तीळ २ चमचा
- जीरे अर्धा चमचा
- ओवा पाव चमचा
- हिंग पाव चमचा
- हळद पाव चमचा
- धने पावडर एक चमचा
- आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप
- चवीनुसार मीठ
- स्वच्छ सूती कपडा किंवा बटर पेपर
कृती
प्रथम हिरवी मिरची, लसूण आणि जीरे ठेचून बारीक करावे , ( मिरचीचा ठेचा बनवतो तेव्हढे बारीक करावे ) नंतर मोठी थाळी किंवा परात घ्यावी त्यामधे भिजवलेले पोहे, कांदा, कोथंबीर, वाटलेलली मिरची, लसुन, जीरे, ओवा, तीळ, दहि, हळद, हिंग, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल टाकून सगळे जिन्नस चांगले मिक्स करुन घ्यावे. नंतर त्यामधे घरात उपलब्ध असलेले पीठ आणि घरात उपलब्ध असलेली भाजी बारीक चिरुन किंवा किसुन घालावी, भाजी आणि पीठ घालून पुन्हा एकजीव करुण घ्यावे, कांद्याला पाणी सुटते आणि दहि असल्यामुळे पीठ भिजवायला जास्त पाणी लागत नाही, म्हणून वरील जिन्नस मधे पाहिले पीठ चांगले एकजीव करुण नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालायचे, भाकरीचे पीठ मळतो तसेच मळून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ सूती कापड ओले करुण पोळ पाटावर पसरुन ठेवून, एका वाटी मधे पाणी घेवून हात ओले करुण मळलेल्या पीठातील एक गोळा त्या कापडावर ठेवून गोल आकरात हाताच्या बोटांनी थापूण घ्यावा, पीठ थापतना मधे मधे हात ओला करा म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही, थालीपीठ पातळ थापूण घ्या जास्त जाड नको पातळ थालीपीठ खाण्यास छान लागते कच्चे राहत नाही, थापलेल्या थालिपीठावर तुमच्या हाताची बोटे उमटलेली असतात त्यामुळे थालीपीठ नीट भाजले जात नाही म्हणून लाटण्याच्या साह्याने किंवा हाताच्या तळव्याने थालीपीठ प्लेन करुण घ्या, सगळ्या बाजूने नीट शिजवण्यासाठी ठराविक अंतर ठेवून ४-५ छिद्रे करुण घ्या. गॅस वर तवा गरम करायला ठेवा तव्यावर थोडे तेल सोडा आणि तेल संपूर्ण तव्यावर पसरवा घावणे करताना तव्याला तेल लावण्यासाठी कांदा किंवा बटाटा वापरतात ती पद्धत वापरली तर थालीपीठ तव्याला चिटकत नाही. ( आवडत असेल तर तूप वापरले तरी चालते चव छान लागते ) त्यानंतर थापलेले थालीपीठ कापडासहित उचलून तव्यावर पलटी करा आणि अलगद पणे कापड काढून घ्या, थालिपीठावर थोडे तेल सोडा जे छिद्रे केले होते त्यामधे तेल सोडा २ मिनिटे खालच्या बाजूने भाजून घ्या नंतर पलटी करुण दूसरी बाजू भाजून घ्यावी, मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावे, गरम-गरम थालीपीठ प्लेट मधे घेऊन त्यावर लोणी तूप किंवा बटर घालून चटनी दहि लोणचे किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.
खाण्यासाठी तयार आहे आपले खुसखुशित आणि पौष्टिक इंस्टंट थालीपीठ.
इन्स्टंट थालिपीठाची पद्धत वापरुन आपल्याला आणखी इन्स्टंट थालीपीठ बनवता येते बनवण्याची पद्धत(कृती) एकच नावे फक्त वेगवेगळी आहेत उदा. बेसनाचे थालीपीठ, गव्हाचे थालीपीठ, ज्वारीचे थालीपीठ, बाजरीचे थालीपीठ, तांदुळाचे थालीपीठ, मिक्स भाज्यांचे थालीपीठ.
टिप
- शक्य असल्यास लोखंडी तवा वापरा थालीपीठ अजुन पौष्टिक होतील.
- लहान मुले काही भाज्या खात नाही म्हणून अशा पदार्थामधे भाजी वापरावी,यामुळे पदार्थांची चव वाढते आणि मुले आवडीने खातात.
- भाजी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते कांदा आणि कोथंबीर जास्त घाला.
- एकच पीठ वापरुन थालीपीठ करता येते पण तुम्ही उपलब्ध असलेली सगळी पीठे थोडी थोडी घ्या चव छान लागते आणि असे थालीपीठ आरोग्यास उत्तम ठरते.
- अजून खुप टिप्स आहेत त्या तुम्हाला पुढे दिलेल्या भाजनीचे थालीपीठ रेसिपी मधे मिळतील.
धान्य, डाळी, कडधान्य आणि जीरे,धने,ओवा असे सगळे साहित्य मंद आचेवर भाजून नंतर दळून आणले जाते त्या पिठाला भाजनी म्हणतात. आणि त्या पीठामधे मसाले, कांदा, कोथंबीर घालून पीठ मळून थालीपीठ बनवले जाते म्हणून त्याला भाजनीचे थालीपीठ म्हणतात.
# तुम्हाला जर खमंग आणि चविष्ट भाजनीचे थालीपीठ खायचे असेल तर मी दिलेली भाजणीची रेसिपी करुण बघा.
खमंग आणि चविष्ट थालीपीठ भाजनी
साहित्य
- ज्वारी ४ वाटी
- बाजरी ३ वाटी
- तांदूळ २ वाटी
- गहू १ १ /२ वाटी
- चना डाळ १ वाटी
- मुग डाळ १ वाटी ( सालीची मुग डाळ )
- उडिद डाळ १/२ वाटी ( सालीची उडिद डाळ )
- कडधान्य १ वाटी (मटकी,मुग,मसूर,काळे चने,काबुली चने,)
- साबूदाना १/२ वाटी
- सोयाबीन १/२ वाटी
- धने १/२ वाटी
- जीरे ७ -८ चमचे
- बडिशेप ५ - ६ चमचे
- ओवा ४ -५ चमचे
- मेथी दाने ४ चमचे
- काळीमिरि १२-१५
- लवंग ५-६
कृती
भाजनीसाठी धान्य आणताना उत्तम प्रतीचे आणावे जास्त जुने, पॉलीश केलेले नको सगळे धान्य एका सूती कापडामधे घेवून चांगले चोळून घ्यावे, नंतर निवडावे, पाखडुन चांगले साफ करुण घ्यावे, कारण दुकानामधे धान्याला पावडर लावलेली असते ती निघून जाते. सगळे धान्य एक एक करुण मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावे, मेथी दाने भाजल्यामुळे त्याचा कडवटपणा वाढतो म्हणून फक्त मेथी दाने कच्चे घ्यावे. सगळे धान्य मिक्स करुण भाजु नका वेगवेगळे भाजून एका मोठ्या कागदावर पसरुन ठेवा, कारण भाजलेले धान्य भांड्यात टाकले तर धान्य खुप वेळ गरम राहते आणि त्याला घाम येतो म्हणजेच शेद येतो, यामुळे भाजनीचे पीठ जास्त दिवस टिकत नाही, सगळे धान्य भाजून थंड झाले की मिक्स करुण दळून आणावे, पीठ दळताना जास्त बारीक नको आणि मोठे नको भाकरीचे दळून आणतो तसे चालेल थोडे रवाळ असावे. दळून आणलेले पीठ गरम असते म्हणून लगेच भरुन ठेवू नये, पीठ थंड झाले की एका घट्ट झाकणाच्या डब्ब्यामधे भरुन ठेवावे. पीठ वापरायचे असेल तेव्हा लागेल तेव्हढे पीठ वाटीने किंवा चमच्याने साह्याने काढून घ्यावे, कारण खराब हात किंवा ओले हात पिठाला लागले तर पीठ लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच डब्बा जास्त वेळ खोलून ठेवू नये, पीठ घेतले की लगेच झाकण घट्ट लावून ठेवून द्यावे. अशा प्रकारे तयार केलेले थालिपीठच्या भाजनीचे पीठ ३ ते ४ महिने टिकते, या पीठापासून आपण थालीपीठ, तिखट पूरी, भाजनीचे वडे, कडबोळी असे अनेक पदार्थ बनवू शकतो.
अशा खमंग आणि चविष्ट भाजनीच्या पीठापासून खुसखुशित आणि पौष्टिक थालिपीठे कसे बनवायची याची कृती पुढे दिलेली आहे.
साहित्य
- भाजनीचे पीठ २ वाटी
- बारीक चिरलेला कांदा १ वाटी
- बारीक चिरलेली कोथंबीर १ वाटी
- भिजवलेले पोहे १ वाटी
- दहि ४ चमचे
- हिरवी मिरची ३-४
- लसूण १०-१२ पाकळ्या
- तीळ २ चमचा
- जीरे अर्धा चमचा
- ओवा पाव चमचा
- हिंग पाव चमचा
- हळद पाव चमचा
- धने पावडर एक चमचा
- आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप
- चवीनुसार मीठ
- स्वच्छ सूती कपडा किंवा बटर पेपर.
कृती
प्रथम हिरवी मिरची, लसूण आणि जीरे ठेचून बारीक करावे, ( मिरचीचा ठेचा बनवतो तेव्हढे बारीक करावे ) नंतर मोठी थाळी किंवा परात घ्यावी त्यामधे भिजवलेले पोहे, कांदा, कोथंबीर, वाटलेलली मिरची, लसुन, जीरे, ओवा, तीळ, दहि, हळद, हिंग, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल टाकून सगळे जिन्नस चांगले मिक्स करुन घ्यावे. नंतर त्यामधे भाजनीचे पीठ घालून पुन्हा एकजीव करुण घ्यावे, कांद्याला पाणी सुटते आणि दहि असल्यामुळे पीठ भिजवायला जास्त पाणी लागत नाही, म्हणून वरील जिन्नस मधे पाहिले पीठ चांगले एकजीव करुण नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालायचे, भाकरीचे पीठ मळतो तसेच मळून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ सूती कापड ओले करुण पोळ पाटावर पसरुन ठेवून, एका वाटी मधे पाणी घ्यावे त्यामधे हात ओले करुण मळलेल्या पीठातील एक गोळा त्या कापडावर ठेवून गोल आकरात हाताच्या बोटांनी थापूण घ्यावा, पीठ थापतना मधे मधे हात ओला करा म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही, थालीपीठ पातळ थापूण घ्या जास्त जाड नको पातळ थालीपीठ खाण्यास छान लागते कच्चे राहत नाही, थापलेल्या थालिपीठावर तुमच्या हाताची बोटे उमटलेली असतात त्यामुळे थालीपीठ नीट भाजले जात नाही म्हणून लाटण्याच्या साह्याने किंवा हाताच्या तळव्याने थालीपीठ प्लेन करुण घ्या, सगळ्या बाजूने नीट शिजवण्यासाठी ठराविक अंतर ठेवून ४-५ छिद्रे करुण घ्या. गॅस वर तवा गरम करायला ठेवा तव्यावर थोडे तेल सोडा आणि ते संपूर्ण तव्यावर पसरवा घावणे करताना तव्याला तेल लावण्यासाठी कांदा किंवा बटाटा वापरतात ती पद्धत वापरली तर थालीपीठ तव्याला चिटकत नाही. ( आवडत असेल तर तूप वापरले तरी चालते चव छान लागते ) त्यानंतर थापलेले थालीपीठ कापडासहित उचलून तव्यावर पलटी करा आणि अलगद पणे कापड काढून घ्या, थालिपीठावर थोडे तेल सोडा जे छिद्रे केले होते त्यामधे तेल सोडा २ मिनिटे खालच्या बाजूने भाजून घ्या नंतर पलटी करुण दूसरी बाजू भाजून घ्यावी, मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावे, गरम-गरम थालीपीठ प्लेट मधे घेऊन त्यावर लोणी तूप किंवा बटर घालून चटनी दहि लोणचे किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.
खाण्यासाठी तयार आहे आपले खुसखुशित आणि पौष्टिक भाजनीचे थालीपीठ.
टिप
- थालीपीठ मधे कांदा आणि कोथंबीर जास्त घाला चव छान लागते.
- थालीपीठ मधे पालक, मेथी, कांद्याची पात, किसलेला मुळा, काकडी, गाजर, बीट, कोबी, बटाटा, दुधी भोपळा यासारख्या भाज्या घालू शकता.
- थालीपीठ मधे पनीर किसुन घातले तर अजुन पौष्टिक आणि टेस्टी थालीपीठ होतील
- थंडीमधे थालीपीठ करताना पिठामधे तीळ जास्त घाला चव छान लागते आणि थंडीमधे तीळ खाल्लेले आरोग्यासाठी चांगले असते.
- थालीपीठ करताना ते पातळ थापूण घ्या पातळ केलेले थालीपीठ क्रिस्पी होते.
- थालीपीठचे पीठ मळताना त्यामधे भीजलेले पोहे घातल्यास थालीपीठ खुसखुशित होते किंवा शिळा भात असेल तर तो घाला थालीपीठ क्रिस्पी लागतात.
- थालीपीठ भाजताना दोन्ही बाजूने मंद आचेवर खरपुस होईपर्यंत भाजून घ्या भाजताना तेल तूप किंवा बटर जे काही वापरता ते थोडे जास्त वापरा त्यामुळे थालीपीठ क्रिस्पी होतात.
- थालीपीठ थापतना तव्यावर थापायचे म्हणजे तवा थोडा गरम झाल्यावर तेल सोडून थालीपीठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात घेवून तो थापूण घ्यायचा नंतर त्याला छिद्रे पाडायचे असे केल्यावर थालीपीठ अजुन टेस्टी होते, पण सवय असेल आणि माहिती असेल त्यांनी हा प्रयोग करा नाहीतर हात भाजायची शक्यता आहे.
थालीपीठाचे आणखी काही प्रकार आहे शिंगाड्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, ज्वारीचे थालीपीठ, बेसनाचे थालीपीठ, उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ, रताळीचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, मिक्स भाज्यांचे थालीपीठ
भाजनीचे काकडीचे थालीपीठ
काकडीचे थालीपीठ करण्यासाठी वरील दिलेली भाजनीचे थालीपीठ रेसिपीची पद्धत वापरावी. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्यावी, काकडी थोडी चिरुन खावून बघावी कारण काही काकडया कडु असतात त्यामुळे थालीपीठची चव बिघडते, काकडी चांगली असेल तर २ काकडया किसुन घ्या व पिठात काकडीचा किस मिक्स करा पुढील कृती भाजनीच्या थालिपीठाची वापरावी.
खमंग आणि चविष्ट उपवासाची थालीपीठ भाजनी
साहित्य
- साबूदाना २ वाटी
- राजगिरा २ वाटी
- वराई ३ वाटी
- जीरे २ चमचे
कृती
गॅसवर कढई ठेवा त्यामधे प्रथम राजगिरा भाजून घ्या, राजगिरा लगेच फूलतो त्याच्या लह्या तयार होतात म्हणून तो थोडा थोडा भाजून घ्या. नंतर वराई हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या, जास्त भाजल्या गेली तर ति कडवट लागते. आता साबूदाना भाजून घ्या तो पण लगेच फूलतो तडतड आवाज आला की समजायचे भाजत आला शेवटी जीरे भाजून घ्या, हे सगळे साहित्य मंद आचेवर भाजून घेऊन एका कागदावर पसरुन ठेवा थंड झाल्यावर मिक्सर मधे वाटून घ्या. ( थालीपीठ भाजनी रेसिपी मधे भाजनी कशी करायची काय करायचे याची सविस्तर माहिती दिली आहे )
अशा खमंग आणि चविष्ट उपवासाच्या भाजनी पासून आपल्याला उपवासाचे धिरडे, चकली, वडे, डोसे आणि उपवासाचे थालीपीठ बनवता येते.
उपवासाचे भाजनीचे थालीपीठ
साहित्य
- उपवासाचे भाजनीचे पीठ २ वाटी
- उकडलेले बटाटे ४
- शेंगदाण्याचा कूट १/२ वाटी
- जीरे १ चमचा
- हिरवी मिरचीची पेस्ट १ चमचा
- किसलेले आले १ इंच
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तूप
कृती
प्रथम एका भांड्यामधे उपवासाचे भाजनीचे पीठ घ्या, त्यामधे उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, किसलेले आले, जीरे, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून पीठ चांगले एकजीव करुण मळून घ्या स्वच्छ सूती कापडा ओला करुण तो पोळ पाटावर ठेवुन मळलेल्या पीठाला पाण्याचा हात लावून पीठाचा छोटा गोळा घ्या तो कापड़ावर ठेवून हाताने थापूण घ्या. गॅस वर तवा ठेवून त्यावर तूप टाकून पसरुन घ्या, थापलेले थालीपीठ तव्यावर टाकून मंद आचेवर दोन्ही बाजूने चांगले खरपुस भाजून घ्या, आता प्लेट मधे घेऊन वरुण तूप घालून उपवासाची चटनी किंवा दहि बरोबर सर्व्ह करा.
खाण्यासाठी तयार आहे उपवासाचे चविष्ट आणि खसखुशित भाजनीचे थालीपीठ.
टिप
- भाजनी मधे आपण जो पदार्थ मिक्स करतो थालिपिठला तसे नाव दिले जाते, उदाहरण भाजनी मधे रताळे वापरले तर रताळीचे थालीपीठ, काकडी वापरली तर काकडीचे थालीपीठ, साबूदाना वापरला तर साबूदाना थालीपीठ म्हणजे थालीपीठ बनवायची प्रक्रिया सारखीच, नवीन पदार्थ मिक्स केला की नाव बदलते पदार्थ बनवण्याची पद्धत तीच असते.
- काकडीचे थालीपीठ २ प्रकारे करता येते, पहिले काकडीचे थालीपीठ आणि दूसरे उपवासाचे काकडीचे थालीपीठ
- उपवासाचे थालीपीठ बनवताना तुम्ही बटाटा, साबुदाना, काकडी आणि रताळी वापरता हे खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळे स्पेशल खायचे मन झाले तर तुम्ही पनीर किसुन ते थालीपीठ मधे घालूण बघा खुप टेस्टी थालीपीठ होते
उपवासाचे काकडीचे थालीपीठ
उपवासाचे भाजनीचे थालीपीठ करताना वापरलेली पद्धत वापरुन काकडीचे थालीपीठ करा, काकडीचे थालीपीठ असल्यामुळे भाजनीच्या पिठात किसलेली काकडी १ वाटी घालून बनवा. काकडी टेस्ट करुण किसुन घ्या नंतर पिठामधे मिक्स करा कारण काहि काकडया कडु असतात.
भाजनीच्या थालीपीठ पेक्षा काकडीचे थालीपीठ छान लागते आणि काकडी वापरल्यामुळे ते खुप वेळ मऊ राहते कडक होत नाही. तयार झालेले काकडीचे थालीपीठ दहि किंवा उपवासाच्या चटनी बरोबर खाण्यास घ्यावे.
उपवासाचे साबुदाना थालीपीठ
साहित्य
- भिजवलेले साबुदाना १ वाटी
- उकडलेला बटाटा १
- हिरवी मिरची २-३
- किसलेले आले १ इंच
- शेंगदाना कूट ४ चमचे
- जीरे अर्धा चमचा
- अरारोट पावडर १ चमचा
- राजगिरा पीठ २ चमचे
- आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप
- चवीनुसार मीठ
कृती
अर्धी वाटी साबुदाना २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या, अर्धा तास पाण्यात ठेवा नंतर सगळे पाणी काढून ५ तास भीजत ठेवा. एक भांडे घेवून त्यामधे भीजलेला साबूदाना, उकडलेला बटाटा, शेंगदान्याचा कूट, जीरे,किसलेले आले, बारीक चिरलेली हिरवी मिरची,( पेस्ट केली तरी चालते तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार मिरचीचे प्रमाण घ्या ) राजगिरा पीठ किंवा भाजनीचे पीठ दोन्ही नसेल तर १ चमचा आरारोट पावडर बाइडिंग साठी वापरा( arrowroot powder ) सगळे जिन्नस एकजीव करुण घ्या. स्वच्छ सूती कपडा घेऊन ओला करा तो पोळ पटावर पसरुन ठेवून, या मिश्रणाचा छोटा गोळा घेवून तो थापूण घ्या, ( साबूदाना थालीपीठ तव्यावर थापले तर अजुन टेस्टी लागते ) या थालिपिठाला छिद्रे करायची गरज लागत नाही, दोन्ही बाजूने चांगले खरपुस भाजून घ्यावे. प्लेट मधे घेऊन उपवासाच्या चटनी बरोबर सर्व्ह करावे, खाण्यास तयार आहे उपवासाचे साबूदाना थालीपीठ.
टिप
- साबुदाना थालीपीठ करताना उपवासाची भाजनी नसेल तरी चालते आरारोट पावडर वापरुन करता येते.
- मिश्रण एकजीव करताना हलक्या हाताने मिक्स करुण घ्या, पीठ मळतो तसे मळू नका थालीपीठ मधे साबुदान्याचे दाने दिसले पाहिजे.
- साबुदाना थालीपीठ करताना पाण्याचा वापर कमी करावा, शक्य असेल तर थालीपीठ तव्यावर थापुण घ्या.
- शेंगदाने भाजून कूट करावा कूट बारीक करु नये, थालीपीठ खाताना क्रिस्पी दाने दाता खाली येतात तेव्हा छान लागते.
खोबऱ्याची उपवासाची चटनी
साहित्य
- ओले खोबरे १ वाटी
- भाजलेले शेंगदाणे १/२ वाटी
- आले १ इंच
- हिरवी मिरची २-३
- साखर १/२ चमचा
- जीरे १/२ चमचा
- तूप २-३ चमचे
- गरजेनुसार मीठ
कृती
एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओले खोबरे, शेंगदाणे, हिरवी मिरची, आले, साखर आणि चवीनुसार मीठ घेवून बारीक वाटून घ्या. नंतर वाटलेली चटनी एका भांड्यात काढून घ्या, गॅसवर फोडणीसाठी भांडे ठेवून त्यामधे तूप गरम करुण गॅस बंद करा आणि गरम तूपामधे जीरे घालून चटनीला फोडणी द्या.
टिप
- गॅस बंद करुण जीरे घातले तर ते करपत नाही.
- चटनीचे मिश्रण वाटताना पाणी घालू नका, चटनी पातळ हवी असेल तरच थोडे पाणी घाला.
- चटणीची चव आंबट हवी असेल तर ३-४ चमचे दहि घाला किंवा १ चमचा लिंबूचा रस घाला.
काकडीची उपवासाची चटनी
किसलेली काकडी १ वाटी, ८-१० चमचे दहि, ५-६ चमचे शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळे जिन्नस एकत्र करुण चांगले मिक्स करुण घ्यावे,
तयार आहे उपवासाची चविष्ट चटनी उपवासाच्या थालीपीठ बरोबर खाण्यासाठी घ्यावी.
थालीपीठ हा पदार्थ असा आहे तो कसाही बनवला तरी तो चविष्ट होतो. कमी साहित्य वापरुन बनवता येतो. श्रीमंत आणि गरीब दोघांच्या खिशाला परवडेल असा पदार्थ आहे, परंतु आता लोक पारंपारिक पदार्थ विसरत चालले आहेत, बाहेरचे इन्स्टंट रेडिमेड पदार्थ खाल्ले जात आहेत आणि आता तर पदार्थाच्या पुढे पनीर, बटर, चीज़ असे नाव लिहले की तो पदार्थ खूप स्पेशल होऊन जातो, त्यामुळे कोणताही पदार्थ लहान मुले आणि मोठी माणसे देखील आवडीने खाऊ लागली आहेत, त्याचप्रमाणे आपणही थालीपीठ बनवताना पनीर, बटर, चीज़ वापरले तर घरातील ज्या व्यक्ती थालीपीठ खात नाहीत त्यासुद्धा आवडीने खातील.
महत्वाचे काय आहे हे तुमच्या लक्षात आले असेल तुमच्याकडे खमंग आणि चविष्ट अशी थालीपीठाची भाजनी असेल तर तुम्ही त्यापासून अनेक प्रकारचे थालीपीठ बनवून खाऊ शकता. आणि भाजनी नसेल तरीही तुम्ही पौष्टिक थालीपीठ बनवून खाऊ शकता
1 टिप्पण्या
Khupach chan apan dileli mahiti upyogi tharel thalipeeth he sarvana avdnare ahe n tumhi dilelya mahiti nusar konihi banvu shakte
उत्तर द्याहटवाDhanyavad
Ashich mahiti share karat raha