Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

आवळ्याचे औषधि उपयोग आणि पदार्थ ( GOOSEBERRY )


आवळ्याचे औषधि उपयोग आणि पदार्थ 

MEDICINAL  USE OF INDIAN  GOOSEBERRY 




               
        आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा    आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.   आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे.  आवळा पोषणाचं काम करतो. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो.  म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो.  आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्लमधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. आवळा मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. 

Amazon Best Deals of the Day

काही पदार्थ आवळ्याचे.

आवळा मुरंबा

साहित्य

 २ किलो आवळे, २ किलो साखर, २० ग्रा. चुना, १० ग्रा. छोटी वेलची, १० ग्रा. चांदीचा वर्क, १ ग्रा. केसर, पाणी आवश्यकतेनुसार

कृती. 

आवळ्यास जाड दाभणाने टोचून घ्यावे. चुन्याचे तीन भाग करावे. एक भाग चुना पाण्यात मिळवावे आणि आवळ्यास त्यात टाकावे. ४ तासानंतर आवळ्यास चुन्याच्या पाण्यातुन काढुन ते पाणी फेकुन द्यावे आणि दुसरा भाग चुना पाण्यात टाकुन आवळे २४ तास भिजवावे नंतर याच प्रमाणे तिसरा भाग चुना पाण्यात टाकुन साखरेचा एका तारेचा पाक तयार करावा. केसर व छोटी वेलची वाटुन त्यात मिसळावी व आवळे त्यात टाकावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.

आवळ्याचा मोरावळा 

साहित्य.

 मध्यम आकाराचे चांगले रसरशीत डोंगरी आवळे, अर्धा किलो साखर, सहा वेलदोड्यांची पूड, एक मोठा चमचा आल्याचा रस. 

कृती. 

आवळे धुऊन पुसून त्यांना खूप टोचे मारावेत व ते चांगले वाफवून घ्यावेत. मग साखरेचा एक तारी पाक करून त्यात आवळे घालावेत. मग पातेले खाली उतरवून तसेच झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा मंद आचेवर पातेले ठेवून दोन-चार उकळ्या आणाव्यात. दोन तारी पाक झाला, की पहिल्याप्रमाणे झाकून ठेवावे. तिसऱ्या दिवशी एक-दोन उकळ्या आणाव्यात. पातेले खाली उतरवून अर्धवट झाकून ठेवावे. गार झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ढवळून चविष्ट मोरावळा बरणीत भरावा व झाकण घट्ट लावावे. 


आवळ्याचे लोणचे

साहित्य.

 पाच-सहा रसरशीत डोंगरी आवळे, 1 मोठा चमचा मोहरी,  1 चमचा धने, 1  चमचा जीरे, आर्घा चमचा मेथी दाने 1 दोन छोटे चमचे लाल तिखट, दोन छोटे चमचे मीठ, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा पिठीसाखर व हिंगपूड, पाव वाटी मोहरी तेल. 

कृती

प्रथम मोहरी,जीरे, धने तव्यावर भाजून घ्या, नंतर  गॅस बंद करुण  मेथीदाने टाकून थोडे परतून घ्या ( मैथीदाने  जास्त भाजल्यावर कडवटपणा वाढतो ) या  भाजलेल्या मिश्रणाची रवाळ अशी पूड करुण घ्यावी. नंतर कढईमधे  पाव कप मोहरी  तेल गरम करुण त्यामधे आवळ्याचे बारीक काप करुण तळून घ्या हलकासा सोनेरी रंग आला की गॅस बंद करा थोडे थंड झाल्यावर वाटलेले रवाळ मिश्रण त्यामधे घाला चवीनुसार मीठ,साखर, तिखट, हळद, हिंग घालून एकजीव करुण घ्या.  तयार झालेले लोणचे काचेच्या बरणित भरून झाकण घट्ट लावून 3 दिवस बाहेर ठेवा नतर  फ्रिज मधे ठेवा 5 -6  महीने चांगले रह्ते 

टीप. यात 2-3 कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडे आल्याचे तुकडे घातले तर लोणचे छान लागते. 

आवळ्याची चटणी

साहित्य 

आवळे, मीठ, तिखट, जिरेपुड, गुळ, मोहरी, हिंग, हळद 

कृती 

चांगले मोठेसे, डाग नसलेले आवळे दोन शिट्या करून कुकर मधे उकडून घ्यावेत. बिया व जमतील तितक्या शिरा काढून टाकाव्यात. हाताने नीट कुस्करावेत. मोठ्या किसणीवर किसले तरी चालेल. मग यात चवीप्रमाणे मीठ,तिखट,जिरेपूड व थोडा गूळ किसून मिसळावा. नीट एकजीव करावे. वरून मोहरी, हिंग व हळदीची खमंग फ़ोडणी द्यावी. हिंग नेहेमीपेक्षा किंचित जास्त असावा. पुन्हा नीट एकत्र करावे. ही चटणी आंबटगोड, रुचकर लागते.

आवळा कॅन्डी

साहित्य.

 १ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर 

कृती.

 चांगले निवडलेले आवळे स्वच्छ धुवून, पुसून, पाणी न घालता बंद डब्यात भरावे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून ३-४ शिटट्या होऊ द्याव्यात. पूर्णपणे गार झाल्यावर आता आवळ्याच्या पाकळ्या सहजपणे वेगळ्या करता येतील. बी काढून टाकून सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्या. हे आवळे भांडयात काढून त्यावर साखर पेरावी अश्या त-हेने आवळे पूर्णपणे साखरेने झाकले जातील. आता हे भांडे उन्हात ठेवावे. आठ तासांनी साखरेचा पूर्णपणे पाक झाला असेल. हे भांडे पुढील दोन दिवस उन्हातच राहू द्यावेत. तिस-या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाच्या तळाशी जातील. आता चाळणीवर हा पाक गाळून घ्यावा. वर उरलेल्या कॅन्डी उन्हात अजून २-३ दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवी असल्यास कॅन्डीवर पिठी साखर चोळावी. वाळलेल्या कॅन्डी बंद डब्यात भराव्यात. 

टिप -  उरलेला पाक हा आवळा सरबत म्हणून उपयोगात आणता येतो. पाक बाटलीत भरुन, फ्रीज मध्ये ठेवावा. सरबत प्यायच्या वेळेला एक ग्लास पाण्यात २-३ चम्मचे पाक मिसळल्यास आवळा सरबत तयार.



आवळा सरबत 

साहित्य. 

ताज्या आवळ्याचा एक भांडे भरून रस, एक मोठा चमचा आल्याचा रस, थोडे शेंदेलोण व पादेलोण, आवळा रसाच्या चौपट साखर. 

कृती

साखरेचा दोन तारी पाक करावा व तो गार झाला की त्यात आवळा रस मिक्स करुण घ्या.  मिठ, आल्याचा रस व लिंबाचा रस  घालून हे मिश्रण ढवळून चांगले एकजीव करावे व बरणीत भरून ठेवावे. हे सरबत प्यायला घेताना एक मोठा चमचा सिरप घेऊन त्यात आवडीप्रमाणे थंडगार पाणी घालून ढवळून प्यावे मधुर लागते 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या