Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

कोहळ्याचे गुणधर्म, उपयोग आणि पदार्थ ( WHITE PUMPKIN BENEFITS )

कोहळ्याचे  गुणधर्म, उपयोग आणि पदार्थ 

BENEFITS OF WHITE PUMPKIN 







कोहळा ( white Pumpkin )  वास्तुदोष  दूर करतो  हे आपल्याला  माहिती  आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का उत्तम आरोग्यासाठी औषधि  गुणधर्म  देणारे हे  फळ आहे.  आहारशास्त्राबरोबरच  आयुर्वेदिक शास्त्रातही तिच्या औषधी गुणधर्मामुळे महत्त्वाची वनस्पती समजली जाते. मराठी मध्ये कोहळा तर संस्कृतमध्ये विदारी कुष्मांड या नावाने हे फळ ओळखले जाते. ही वनस्पती वेलीच्या स्वरूपात असते, तर तिची पाने मोठी व लांब असतात. कोहळा हे फळ गोल, लंबगोल आकाराचे असून त्याचा आतील गर हा मऊ व पांढराशुभ्र असतो व त्यामध्ये आद्र्रतेचे (पाण्याचे) प्रमाण जास्त असते. हेमंत ऋतूमध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसांत कोहळ्याच्या वेलीला फुले येतात, तर ग्रीष्म ऋतूमध्ये  फळे येतात. कोहळा हे फळ अनेक महिने टिकते.

औषधी गुणधर्म

कोहळा हा शीत, लघू, स्निग्ध, मधुर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ, आद्र्रता, ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. त्याच्या या औषधी गुणधर्मामुळे आहारामध्ये त्याचा आवर्जून वापर करावा. आग्य्राचा पेठा म्हणून प्रसिद्ध असलेली मिठाई ही कोहळ्यापासूनच बनवली जाते. कोहळ्याचे थालीपीठ, पराठा, भाजी, कोहळा रस व सूप असे अनेक प्रकार बनविता येतात.

कोहळ्याचा उपयोग

कोहळा सप्तधातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वाढीच्या वयातील मुलांना याची नियमितपणे थालीपीठ, भाजी करून द्यावी. यामुळे मुलांची सर्व अवयवांची वाढ चांगली होऊन उंचीदेखील वाढते. तसेच स्मरणशक्ती व बुद्धीवर्धनासाठीदेखील कोहळ्याचा वापर करावा.

मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढविण्यासाठी कोहळ्याचा आहारात वापर करावा. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.

कोहळ्यामध्ये तंतुमय पदार्थ व आद्र्रता भरपूर असल्याने मलावरोधाची तक्रार असलेल्यांनी कोहळ्याची भाजी खावी. यामुळे शौचास साफ होते.

मूळव्याधीचा त्रास होत असेल व शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर कोहळा आवर्जून खावा.

कोहळा हा शुक्रवर्धक असल्याने व धातूदौर्बल्य दूर करून धातूंचे पोषण करणारा असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांनी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.

हृदयविकार असणाऱ्यांनी हृदयाचे बळ वाढविण्यासाठी कोहळा रस किंवा कोहळा सूप प्यावे.

नाकातून रक्त येणे या विकारात कोहळ्याचा रस प्यावा, कारण कोहळा हा रक्त पित्तशामक असल्याने लगेचच आराम मिळतो.

कृश व्यक्तींनी धातूदौर्बल्य कमी होऊन शरीराचे पोषण होण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी कोहळ्यापासून बनविलेला कोहळेपाक नियमित खावा.

गर्भवती स्त्रीने कोहळ्यापासून बनविलेला कुष्मांडावलेह या अवलेहाचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे गर्भस्थ बाळाचे व मातेचे पोषण व्यवस्थित होते.

तळहात, तळपाय यांची आग होत असेल व त्याबरोबर जळवात हा विकार झालेला असेल तर रात्री झोपताना तळव्यावर कोहळ्याचा कीस बांधून ठेवावा, त्यामुळे थंडावा निर्माण होऊन भेगा हळूहळू कमी होतात.

जुनाट ताप, सर्दी, खोकला, क्षयरोग, टायफॉइड, मलेरिया, कावीळ आदी आजारांमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर त्यावर कोहळा हे उत्तम टॉनिक आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोहळ्याचा रस साखर घालून प्यावा.

भाजलेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी कोहळ्यांच्या पानांचा किंवा फळाच्या आतील गर त्वचेवर लावावा. त्यामुळे लगेचच दाह कमी होतो.

 चेहऱ्यावरील मुरुमे, काळे डाग कमी करून सौंदर्य वाढवण्यासाठी कोहळ्याचा गर चेहऱ्यावर लावावा.

 मूतखडा झालेला असल्यास तसेच लघवी साफ होत नसल्यास व लघवीला जळजळ होत असेल तर कोहळ्याचा रस प्यावा.

अशा प्रकारे शरीराच्या सप्तधातूंचे पोषण होऊन त्यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये कोहळ्याचे सेवन आवर्जून करावे.

स्वयंपाक, औषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्यमकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ यांतही औषधी गुणधर्म असतात. 

- पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो. 

- दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्चित  हातभार लागतो.


Amazon Best Deals of the Day.

काही कोहळ्याचे पदार्थ

कोहळ्याचे सांडगे 

साहित्य. कोहळे, काकडी व गाजर यांचा प्रत्येकी १ वाटी किस, तीळ १ वाटी, वाटलेल्या मिरच्या पाव वाटी, मीठ २ चमचे, हळद अर्धा चमचा. 

कृती. सर्व साहित्य एकत्र करून एकजीव कालवावे व प्लॅस्टिकच्या कागदावर छोट्या आकाराचे सांडगे कडक उन्हात २-३ दिवस वाळवून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे. 

कोहळ्याचे पेठा

साहित्य. १/२ ते ३/४ किलो कोहळा, १/२ किलो साखर, १-२ चमचे खायचा चुना, तुरटी., गुलाब/केवडा पाणी. 

कृती. कोहळा सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे. चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे.  कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी. दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे. एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे. कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे. एका भांड्यात मंद आचेवर साखर भिजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे. मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.  एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे.  

(झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये.) पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. 

कोहळ्याच्या वड्या 

साहित्य. ५०० ग्रॅम कोहळ्याचा कीस, २ नारळ, ३ वाट्या साखर, १ वाटी पिठी साखर, एक चमचा तूप, १ वाटी साय किंवा खवा, 

कृती. कोहळ्याचा किस वाफवून घ्यावा. नारळ खरवडून मिक्सरमध्ये बारीक वाटावा. एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्याला तूपाचा हात फिरवावा. त्यात नारळ, कीस, साधी साखर व साय किंवा कुस्करलेला खवा घालावा. चुलीवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे चुलीवर ढवळावे. खाली उतरवून मिश्रण कोमटसर होईपर्यंत घोटावे. तूपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व पृष्ठभाग गुळगुळीत करावा. नंतर थंड झाल्यावर  वड्या कापाव्या.

कोहळ्याचा परांठा 

साहित्य. ताजा कोहळा १/२ किलो ,  तिखट  १-२  चमचे ,  हळद १/२ चमचे , कोथिंबीर १ जुडी , बारीक चिरलेली. मीठ  आवडीनुसार  व कणिक आवश्यकतेनुसार , तेल किंवा तूप  ४-५ चमचे. धनिया पावडर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर (तिखटा एवजी),  हिरवी मिरची बारीक चिरलेली २ - ३, चाट मसाला.  

कृती. एका परातीत कोहळा किसून घ्यावे, त्यात तिखट, हळद,  मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर व  पीठ मळण्यासाठी आवश्यक  कणिक  मिसळावी,   मीठ टाकल्यामुळे कोहळ्याला पाणी सुटते म्हणून पाणी मिसळण्याची आवश्यकता नाही. तव्यावर तूप किंवा तेल टाकून पराठा दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्या. 

कोहळ्याचे रायते

कोहळा धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी. 



कोहळ्याचा पॅन केक

साहित्य. एक वाटी कोहळ्याचा कीस, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, प्रत्येकी एक मोठा चमचा रवा, बेसन, दही आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी बारीक चिरलेला गूळ, चवीला मीठ, पाव चमचा इनोज फ्रूट सॉल्ट, तेल.

कृती. तेल आणि इनोज सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र करावे. लागेल तसे पाणी घालून पीठ तयार करावे, इनोज मिसळावे आणि तव्यावर तेल सोडून पॅनकेक करावे.

कोहळ्याचे सांबार

साहित्य. दोन वाटय़ा कोहळ्याच्या फोडी, प्रत्येकी पाव वाटी भिजलेले शेंगदाणे, चण्याची डाळ आणि काजू, एक मोठा चमचा बेसन, चवीला मीठ, तिखट, चिंचेचा कोळ आणि गूळ, एक चमचा गोडा मसाला, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता.

कृती. कोहळा, शेंगदाणे, काजू कुकरमध्ये शिजवून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता, शिजलेले दाणे, कोहळा, मीठ, तिखट, चिंच, गूळ, मसाला आणि बेसन पाण्यात कालवून घालावे, लागेल तसे पाणी घालावे आणि सांबार उकळू द्यावे.


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या