तांदुळाचे उकडीचे मोदक आणि गव्हाचे तळणीचे मोदक
गणपती बाप्पा मोरया
मोदक म्हणजे आनंद..... मोद म्हणजे आनंद देणारे.
मोदक ही पाककृती तांदूळबहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे. तुम्ही पाहिले असेल तर मोदकांचा आकार हा श्रीफळा सारखा दिसतो प्राचीन काळापासून भारतभरात पुजेसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो, जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केले जाते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ मराठवाडा इथे तळणीचे मोदक होतात, त्याचप्रमाणे आतले सारण बनवले जाते, ओला नारळ जिथे भरपूर उपलब्ध तिथे त्याचा वापर जास्त जिथे ओला नारळ नाही तिथे सूखे खोबरे वापरले जाते. पाककृती एकच पण तिचे नावे अनेक आहे तमिळ आणि मल्याळी भाषेत कोळकटै, उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे, सारण भरुन गोल वळलेले कोळकटै हे केरळ आणि दक्षिण तमिळनाडुत प्रसिद्ध आहेत. ओरिसा आसाम आणि बंगालमधे तांदूळपिठाच्या उकडीची पातळ पारी करुण त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरुन घडी घालून केळीच्या पानांवर वाफवतात त्याला पीठा म्हणतात. कानडी भाषेत कड़बू तेलगू भाषेत कुडुमु म्हणजे साहित्य तेच पण आकार आणि नाव वेगळ.
आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक. २१ ही संख्या गणपती बाप्पाला प्रिय आहे म्हणून २१ मोदकांचा नैवेद्य, २१ दुर्वांची जुडी आणि २१ पत्री वाहिले जाते. गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य आणि लाडके दैवत आहे मोदक खाल्ले की बाप्पांचे मन प्रसन्न आणि आनंदी होत असे. गणपति बाप्पा बुद्धीचे आणि विद्याचे दैवत आहे आनंद देणारे सुःख देणारे आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा.
मोदकाचे प्रकार दोन आहेत पहिला उकडीचे मोदक आणि दूसरा तळणीचे मोदक, आपण हे दोन्ही प्रकार पाहूया. काळानुसार खाद्यपदार्थांमधे सुद्धा बदल झाले, हल्ली मोदकाचे अनेक प्रकार पहायला मिळतात ड्रायफ्रूट्स मोदक, खव्याचे मोदक, चॉकलेट मोदक इत्यादि पाहिले उकडीचे मोदक कसे बनवतात हे आपण पाहूया.
साहित्य
- साजुक तूप ५-६ चमचे
- पाणी १ वाटी
- दूध १ वाटी
- मीठ चिमुटभर
- तांदुळाचे पीठ २ वाटी
- किसलेले ओले खोबरे २ वाटी
- खवा (optional) अर्धी वाटी
- चिरलेला गुळ १ १/२ वाटी
- खसखस २ चमचे
- तीळ ४ चमचे
- सुकामेवा आवाड़ीनुसार अर्धी वाटी
- विलायची पूड अर्धा चमचा
- जायफळ पूड अर्धा चमचा
- केशर
प्रथम तांदुळाचे पीठ कसे बनवायचे हे पाहु. बासमती, आंबेमोहर किंवा दूसरे कोणतेही सुगंधीत तांदूळ धुवून भिजवून घ्या, त्यातले सगळे पाणी काढून एका सूती कपड्यावर पसरवून २ दिवस वाळवून घ्या, कडक उन्हात वाळवू नका पंख्याखाली वाळवले तरी चालते, थोडे ओलसर असताना दळून आणा तांदूळ सुगंधीत घेतले तर मोदक खातना छान चविष्ट लागतो.
खसखस आणि तीळ कढईत भाजून काढून घ्या. नंतर कढईत २ चमचे साजूक तूप घालून खोबरे आणि गुळ घालून मंद आचेवर परतून घ्या, गुळ वितळल्यावर खवा घाला (खवा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालते) तीळ, खसखस आणि आवड़ीनुसार सुकामेवा घाला (ड्राइफ्रूट्स) शेवटी विलायची आणि जायफळ पूड घालून गॅस बंद करा (खवा असेल तर साधारण दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी किसलेला गुळ घाला खवा नसेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर गुळ २-३ चमचे जास्त घाला) सारण थंड करायला ठेवा.
त्यानंतर एका कढईत किंवा पातेल्यात १ वाटी पाणी आणि १ वाटी दूध गरम करत ठेवावे, त्या मध्ये चिमुटभर मीठ घालून उकळून द्या, मग २ चमचे टेबलस्पून तुप टाका. नंतर लगेचच २ वाटी तांदुळाचे पीठ घालून घ्या. ( 1 वाटी पीठ तर 1 वाटी पाणी असे समप्रमाण घ्यायचे तांदूळ जूना असेल तर ३-४ चमचे पाणी जास्त लागेल) आणि लाकडी लाटण्याने चांगले ढवळत रहा, (गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी) नंतर झाकण ठेवून २ मिनिटे वाफेवर शिजवुन घ्या, पीठ पातळ किंवा घट्ट नको थोडे भुसभूशित झाले की गॅस बंद करा. उकड थोडा वेळ झाकून ठेवा. उकड गरम असताना एका परातीत किंवा ताटात घेवून मोकळी करून तुपाचा हात लावून मऊसूत पीठ मळुन घ्या. मग मळुन घेतलेलल्या पीठाचा छोटा गोळा घेवून तेल पाण्याचा हात लावून पातळ पारी बनवून घ्या, हाताच्या साह्याने किंवा लाटून बनवली तरी चालते, (छोटे गोळे करून घ्या म्हणजे मोदक एकसमान बनतात आकाराने) वाटीचा आकार देवून कळी पाडून घ्या, त्यामधे सारण भरा मोदकाचा आकार द्या वरती राहिलेले जास्तीचे पीठ काढून टाका, तयार केलेला मोदक पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्याने तो कोरडा होत नाही वाफवताना चीरा पडत नाही, शेवटी १ कानवले करा पीठ आणि सारण जास्त असेल तर कानवले जास्त कले तरी चालले, नंतर मोदक पात्रात किंवा पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, चाळणीला तुप लावून घ्यावे, म्हणजे मोदक चाळणीला चिकटणार नाहीत. चाळण पातील्यावर ठेवून झाकण ठेवून मध्यम आचेवर मोदक उकडून घ्यावेत. वाफवताना वरुण केशर घाला मोदकाला रंग चांगला येतो मोदक 10 मिनिटे तरी वाफवून घ्यावेत.
मोदकावर केशरचे दूध घालून किंवा गरमागरम साजुक तुप घालून सर्व्ह करावे.
टिप
- सारण आणि उकड करायला भांडे किंवा कढई जाड बुडाची घ्या, नाहीतर पातळ भांडे असेल तर भांड्या खाली तवा ठेवून मंद आचेवर सारण परतून घ्या, असे केल्याने सारण करपत नाही भांड्याला चिटकत नाही
- कढईत तूप घालून त्यावर गुळ बारीक चिरुन घातल्यामुळे लवकर वितळतो, त्यामुळे सारण जास्त वेळ परतावे लागत नाही जास्त वेळ परतले की ते कडक होते
- सारण करताना साखर वापरली तर विलायची पावडर घालावी आणि गुळ वापरला तर जायफळ पावडर घालावी गुळाचे पदार्थ बनवताना जायफळ वापरले तर पदार्थ छान चविष्ट लागतो.
- उकड काढताना पातील्या मधे पाणी घालण्या आगोदर तूप किंवा तेल घाला नंतर पाणी घाला म्हणजे पातेल्याला उकड चिटकत नाही.
- उकडीसाठी घेतलेल्या पाण्यात तूप आणि दूध घातल्यामुळे मोदक मऊ होतात आणि दूधामुळे मोदकाला छान पांढराशुभ्र रंग येतो तूपाऐवजी लोणी घातले तर अजुन चांगले।
- उकडीच्या पाण्यात पीठ घालताना थोडे थोडे घालून लाकडी लाटण्याने हलवत राहिले तर गुठळी होत नाही, आणि पीठ लाटण्याला चिटकत नाही पीठ चांगले मिक्स होते
- पीठ गरम असतानाच मळून घेवून लगेच मोदक करावे, पीठ जास्त वेळ राहिले तर कडक होते आणि मोदक नीट होत नाही.
- मोदक दोन दिवस टिकतात दुसऱ्या दिवशी थोडे कडक होतात म्हणून त्यांना २ मिनिटे वाफ द्यावी म्हणजे पुन्हा नरम होतात.
- मोदक केल्यावर शेवटी एक करंजी (कानवले) करतात आणि करंजी केल्यावर शेवटी मोदक करतात असे का करतात, कारण मोदक आणि करंजी भाऊ-बहिण आहेत असे समजले जाते.
तळणीचे मोदक
हल्ली जास्त करुण घरा-घरात तळणीचे मोदक बघायला मिळतात आताच्या पिढीला तळणीचे मोदक ही पाककृति सोप्पी वाटते वेळ कमी लागतो आणि उकडीच्या मोदका सारखी किचकट नाही शक्यतो फसत नाही आणि खायला छान लागते तळणीचा मोदक २-३ दिवस टिकतो आणि लहान मुलेही आवडीने खातात
साहित्य
- साजूक तूप ३-४ चमचे
- गव्हाचे पीठ १ वाटी
- मैदा १ वाटी
- रवा अर्धी वाटी
- सुके खोबरे २ वाटी
- गुळ १ वाटी
- खवा (optional) अर्धी वाटी
- खसखस २ चमचे
- तीळ ४ चमचे
- विलायची पूड अर्धा चमचा
- जायफळ पूड अर्धा चमचा
- आवाड़ीनुसार सुकामेवा (ड्रायफ्रूट्स)
- चिमुटभर मीठ
- तळण्यासाठी तेल
- गरजेनुसार पाणी
कृती
एका परातीमधे गव्हाचे पीठ, मैदा, रवा आणि चिमुटभर मीठ मिक्स करुण घ्या. ५-६ चमचे तेल चांगले कड़कड़ित गरम करुन या पीठावर घालावे, (मोहन) तेल घातल्यावर पीठ चांगले एकजीव करा. (पीठाची मुठ वळली पाहिजे एव्हढे तेल घालायचे) थोडे थोडे पाणी घालून कणिक जराशी मध्यम सैल मळावी फार घट्ट नाही कारण पिठा मधे रवा भीजतो तो पाणी शोषून घेतो, त्यामुळे पीठ नंतर घट्ट होते, त्यामुळे मोदक तेलात सुटू शकतात, म्हणून आधी थोडे सैल ठेवावे आणि फार सैल नाही कारण मोदक करताना आकार नीट देता येत नाही कळी पसरते आणि मोदक मऊ होतो खुसखुशीत होत नाही. पीठ मळून झाले की त्यावर तेलाचा हात लावून १ तास झाकून ठेवा. आता तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ.
खसखस आणि तीळ कढईत भाजून काढून घ्या. नंतर कढईत २ चमचे साजूक तूप घालून खोबरे आणि गुळ घालून मंद आचेवर परतून घ्या. गुळ वितळल्यावर खवा घाला (खवा ऑप्शनलआहे नाही वापरला तरी चालते) तीळ, खसखस आणि आवड़ीनुसार सुकामेवा घाला (ड्राइफ्रूट्स) शेवटी विलायची आणि जायफळ पूड घालून गॅस बंद करा. (खवा असेल तर साधारण दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी किसलेला गुळ घाला खवा नसेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर गुळ २-३ चमचे जास्त घाला) सारण थंड करायला ठेवा.
आता पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे, पीठाचे गोळे करुण घ्यावे (छोटे गोळे करून घ्या म्हणजे मोदक एकसमान बनतात आकाराने) आपल्याला हव्या त्या आकाराचे मोदक हाताच्या साह्याने किंवा साच्यात भरुन बनवता येतात. गोळ्याची पूरी लाटून घ्यावी किंवा हाताने वाटीचा आकार देवून कळी पाडून घ्या, त्यामधे सारण भरा मोदकाचा आकार द्या आणि दुधाचा हात लावून सील करा वरती राहिलेले जास्तीचे पीठ काढून टाका तयार केलेले मोदक कोरडे पडू नये म्हणून सूती कापड ओले करुण मोदकावर ठेवा. (पीठा मधे रवा असल्यामुळे पीठ लवकर कोरडे पडते) मोदक तळण्यासाठी कढईत मोदक बुडतील इतके तेल घ्यावे (तेल कमी घेतले तर मोदक एकसारखे तळले जात नाही) तेल गरम झाले की मोदक मंद आचेवर तळून घ्यावे. (तेल जास्त गरम झाले तर मोदक टाकल्यावर लगेच रंग बदलतो नीट तळल्या जात नाही आतून कच्चे राहतात) प्रत्येक मोदक व्यवस्थीत तळला गेला पाहिजे त्यासाठी कढईत तळता येतील इतकेच मोदक घ्या, मोदक तळताना काळजी घ्या मोदकाला जास्त त्रास दिला तर तो तेलात फुटू शकतो, हळुवारपणे सगळ्या बाजूनि फिरवून एकसारखे तळून घ्या.
तयार आहेत आपले खुसखुशीत तळणीचे मोदक.
टिप
- पीठ जास्त घट्ट झाले किंवा मोदक लवकर तळले नाही व कोरडे पडले तर तेलात बंद केलेली कळी उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो असे होऊ नये म्हणून कळी बंद करताना दुधाचा हात लावल्यास ती चांगली बंद होते.
- मोदक मंद आचेवर तळल्याने ते कच्चे राहत नाही मऊ पडत नाही आणि खुसखुशीत होतात.
- तुम्हाला मोदक क्रिस्पी हवे असतील तर गव्हाचे पीठ घेऊ नका फक्त मैदा आणि रवा घ्या.
- सारण करताना आपल्या आवडीनुसार सुके खोबरे किंवा ओले खोबरे वापरता येते.
- खवा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी मोदक छान लागतात.
- मोदक कमी साहित्य वापरुन पण बनवू शकतो छान लागतात काही साहित्य ऑप्शनल आहेत.
तांदुळाचे उकडीचे मोदक आणि गव्हाचे तळणीचे मोदक या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करुण बघा आणि रेसिपी आवडली तर like comments and share करायला विसरु नका.
🙏गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया 🙏


7 टिप्पण्या
Mala ghavache ukadiche modak fharra awadatata.tumhi tandalache ukadiche modak kase banawaweta yachi Chan mahiti dili try karayala harkat nahi.thank you Ritu madam.
उत्तर द्याहटवाModak ata sahaj banvu shakto sopya bhashet sangilya baddal abhari ahe
उत्तर द्याहटवाRituja Madam
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhup chan aani Sophi receipe aahe ,aashach receipe pathavat ja
उत्तर द्याहटवाKhup chan ahe recipe me nakki try karen
उत्तर द्याहटवाHe madam mala khup avadtat dhanyavad yachi mahiti dilya baddal tumhi dileli mahiti nakkich upayogi tharel
उत्तर द्याहटवाModak he bahutek sarvanche avdte asnar khup sundar prakare ani sopya paddhatine kruti sangitli ahe konalahi banvta yetil ase
उत्तर द्याहटवा